मुंबई महापालिका निवडणुकीत वंचित आघाडी ८८ जागा लढवणार, प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

मुंबई, ७ ऑगस्ट २०२३ : मुंबई महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ८८ जागा लढवणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मात्र, ठाकरे गटासोबत युतीत निवडणूक लढवणार की स्वबळावर निवडणूक लढवणार हे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले नाही. आम्ही मुंबई महापालिकेत ८८ जागा लढवणार आहोत. त्यामुळे बदलाचे राजकारण सुरू होणार आहे, असे सांगतानाच मुस्लिम समाजात आता नेतृत्व निर्माण झाले पाहिजे. मुस्लिम मतदारसंघात महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत बदल झाला पाहिजे. आम्ही महापालिकेत ८८ जागा लढवणार आहोत, आम्हाला जर महापालिकेत मुस्लिमांनी मदत केली तर बदल घडून येईल, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

एका कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी त्यांनी मुस्लिम राजकारणावरही आपले मत मांडले. खूप वर्षापासून मी मुस्लिमांचे राजकारण पाहत आलो आहे. मुस्लिमांच्या राजकारणात गढे मुर्दे उखडले जात आहेत. यांना दंगली हव्या आहेत काय? अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी नाव न घेता टीका केली.आम्ही ज्यांना गाडले त्यांना विधानसभेत पुन्हा जिवंत केले जात आहे. ही कोणती राजनीती आहे? यांना काय हवे आहे? परिस्थिती अजून खराब होणार आहे. दंगली होतील आणि हे घडवून आणण्याचे काम होणार आहे. कारण काही लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असे आंबेडकर म्हणाले.

देशभर गाजत असलेल्या मणिपूरच्या दंगली संदर्भात बोलताना ते म्हणाले मणिपूरच्या जंगलात प्लॅटिनम आणि युरेनियम या खनिजांचा शोध सुरू करण्यात आला आहे. मणिपूरमधील या खनिज संपत्तीवर अधिकार कोणाचा हा प्रश्न आहे. हा आदिवासी लोकांचा प्रश्न आहे. संविधानाने सांगितले आहे की, जर आदिवासी क्षेत्रात तुम्हांला काही करायचे असेल तर त्यांची परवानगी घेणे महत्त्वाचे आहे.

आता खनिज संपत्ती तर सापडली आहे, त्यामुळे आताच त्याचे उत्खनन करण्याची गरज आहे. परंतु या उत्खननाची परवानगी स्थानिक आदिवासी देणार नाहीत. त्यामुळे मणिपूरमधील मैतेई समजला आदिवासीचा दर्जा देऊन त्यांना आरक्षण देण्यात आले. आता त्यांच्या मार्फत मणिपूर मधील जमीन हस्तगत करण्यात येणार आहे. यासाठीच मणिपूरमधील दोन समाजात भांडणे लावण्यात आली आहेत, असा आरोप आंबेडकर त्यांनी केला.

मुस्लिम समाजातील व्यक्तींना मणिपूरमधे घडलेल्या घटनेच्या संदर्भात काही माहिती नाही. त्यामुळे ते काही या विषयासंदर्भात बोलत नाही. त्यामुळे या बैठकीत जे मौलवी आहेत त्यांनी हे सगळ्यांना सांगावे आणि जे काही आता राजकारणात सुरू आहे याची देखील माहिती द्यावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा