पुणे, ६ ऑगस्ट ,२०२० : राज्यात लॉकडाऊन अजूनही कायम आहे, आणि कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत चालली आहे. अशातच गरिबांचे हाल होत आहेत. याच प्रकरणाबद्दल बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, ” राज्य सरकारने पूर्णपणे लॉकडाऊन हटवावा आणि खऱ्या अर्थाने अनलॉक करावा. अन्यथा आम्ही १० ऑगस्ट नंतर कधीही रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊ, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिला आहे. सध्या दुकाने सम- विषम पद्धतीने उघडत आहेत. ही पद्धत कधी संपवणार आहात? असा सवाल देखील त्यांनी सरकारला केला आहे.
छोटे दुकानदार, टपरीवाले यांची उपासमार होत आहे. एसटी महामंडळ संकटात आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दोन महिने पगार नाही . एसटी रस्त्यावर कधी धावेल त्याची तारीख सांगा. सरकार हे सांगणार नसेल तर १० ऑगस्ट नंतर कधीही आम्ही रस्त्यावर उतरू, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
या महिन्यात पाऊस १५ दिवस पडणार असल्याचा अंदाज आहे. कृष्णा, गोदावरी, वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यातील धरणं ४० ते ७० टक्के भरले आहेत. पुराचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे कोरोना-कोराना करण्याऐवजी पुराचे नियोजन सांगा. मुंबईत झोपडपट्टीत आणि इमारतीत पाणी घुसेल. तरीही सरकार गंभीर नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरॆ