कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीचा प्राथमिक टप्पा पूर्ण… परिणाम सकारात्मक

नवी दिल्ली, दि. २७ जुलै २०२०: भारत बायोटेक कंपनी आणि आय सी एम आर आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांच्या सहयोगाने कोरोनाव्हायरस वर लस बनवण्याचे काम करीत आहे. गेल्या शुक्रवारीच भारत बायोटेकने आपल्या बनवलेल्या या भारतीय बनावटीच्या लसीची पहिली मानवी चाचणी एका तीस वर्ष व्यक्तीवर केली. या व्यक्तीला भारत बायोटेक ने बनवलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ ह्या कोरोना वरील लसीचे ०.५ मिलीलीटर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन दिले गेले होते. भारतीय बनावटीची कोरोनावरील लसीचे मानवी परीक्षण केलेली ही पहिलीच घटना होती.

कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचण्यातील पहिल्या टप्प्यांचे निष्कर्ष उत्साहवर्धक व आशादायी असल्याचे रोहतक येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेतील प्रमुख संशोधक डॉ. सविता वर्मा यांनी म्हटले आहे.

ह्या संदर्भात बोलताना वर्मा यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्याच्या दुसऱ्या भागात आणखी सहा जणांना कोव्हॅक्सिन ही लस टोचण्यात आली. त्यामुळे आता पहिला टप्पा पूर्ण झाला असून देशात एकूण पन्नास जणांना लस देण्यात आली. त्याचे निष्कर्ष उत्साह वाढवणारे आहेत.

पहिल्या टप्प्यात ३७५ स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन देण्यात येणार आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात १०० स्वयंसेवकांवर कोव्हॅक्सिन चाचणी घेण्यात येणार आहे, त्यातील पहिल्या ५० लोकांना लस दिली गेली आहे व त्याचे सकारात्मक परिणाम देखील समोर आले आहेत.

कोव्हॅक्सिनची निर्मिती सार्स सीओव्ही २ विषाणूच्या मृत कणांपासून करण्यात आली असून त्यामुळे विषाणूची लागण होत नाही, पण त्याची प्रतिपिंड तयार होतात. शुक्रवारी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात तीस वर्षांच्या व्यक्तीला ०.५ मि. लि. लस देण्यात आली. त्या व्यक्तीवर आता दोन आठवडे देखरेख केली जाणार असून नंतर दुसरा डोस दिला जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा