सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याची तयारी अंतिम टप्प्यात,कारखान्याच्या १ किमी परिसरात संचारबंदीचे आदेश

सोलापूर १४ जून २०२३ : सोलापूर येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी मुळे, विमान वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे, सोलापूर येथील सजग मंचचे म्हणणे आहे. यासाठी त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. यावर उच्च न्यायालयाने, सोलापूर महानगरपालिकेने यावर योग्य निर्णय घेऊन कार्यवाही करावी असा आदेश दिला होता. ती मुदत ११ जून रोजी संपली आहे. त्यामुळे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याची कार्यवाही आता सुरू करण्यात आली आहे. वादग्रस्त विषय असल्याने सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरात एक किलोमीटर अंतरावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याच्या कामाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. साखर कारखान्यापासून एक किलोमीटरच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहेत. काल संध्याकाळी चार वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार, १३ ते १८ जूनपर्यंत सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनास बंदी असेल. तर कारखान्याच्या एक किलोमीटर परिसरात असलेले सर्व सभागृह, मंगल कार्यालय, रेस्टोरंट, बार, हॉटेल, धार्मिक स्थळ, प्रार्थना स्थळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे दोन हजार कामगार आणि हजारो शेतकरी सभासदांचा, कारखान्याची चिमणी पाडण्यास विरोध आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आता चिमणी पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कामगार आणि सभासदांचा विरोध पाहता प्रशासन आता काय भूमिका घेते हे पहावे लागणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा