मोठ्या निर्णयाची तयारी, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार शेअर बाजार…?

पुणे, २२ फेब्रुवारी २०२३: शेअर बाजारात ट्रेडिंगच्या वेळेत बदल होण्याची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू आहे. मार्केटमधील ट्रेडिंगची वेळ आता दुपारी ३.३० वरून ती ५ वाजेपर्यंत वाढवली जाऊ शकते. बाजार नियामक SEBI ने २०१८ मध्ये वेळ वाढवण्याचा आराखडा तयार केला होता. याबाबत लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

बाजार ३.३० नाही तर ५ वाजता बंद होणार..?

सध्या भारतीय शेअर बाजार सकाळी ९.१५ वाजता उघडतो आणि दुपारी ३.३० वाजेपर्यंत ट्रेडिंग होते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शेअर बाजारात ट्रेडिंग हवर्स वाढवण्याची तयारी केली जात आहे. या अंतर्गत, ट्रेडिंगची वेळ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वाढवता येऊ शकते. तथापि, या संदर्भात बाजारातील सहभागींशी चर्चा अद्याप प्राथमिक टप्प्यावर आहे.

२०१८ मध्ये तयार करण्यात आलं होतं फ्रेमवर्क

मार्केट रेग्युलेटर SEBI ने २०१८ मध्ये ट्रेडिंग तास वाढवण्यासाठी फ्रेमवर्क जारी केला होता. याआधी जानेवारी महिन्यातही सेबीने स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) आणलं होतं. त्यात म्हटल्यानुसार, एक्सचेंजच्या कामकाजात कोणत्याही कारणास्तव व्यत्यय आल्यास, बाजारातील सहभागी, ट्रेडिंग सभासद यांना १५ मिनिटांच्या आत त्याची माहिती द्यावी लागंल. सेबीच्या परिपत्रकात असंही नमूद करण्यात आलं होतं की, जर बाजार बंद होण्याच्या एक तास आधी ट्रेडिंग सामान्य नसेल, तर सर्व एक्सचेंजेसना त्या दिवशी दीड तास ट्रेडिंगची वेळ वाढवावी लागेल.

NSE ची ईच्छा… ट्रेडिंग हवर्स वाढावेत

देशातील सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) इक्विटी सेगमेंटमध्ये ट्रेडिंग हवर्स वाढवण्याच्या बाजूने आहे. मात्र, शेअर बाजारात ट्रेडिंगची वेळ वाढवण्याची चर्चा काही पहिल्यांदाच होत नाही, याआधीही हा मुद्दा चर्चेत आलाय. मात्र आता या संदर्भात जे वृत्त समोर येत आहे, त्यावरून बाजाराच्या वेळेबाबत लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं दिसतं.

झिरोधाचे सीईओ वाढीव वेळेच्या विरोधात

NSE शेअर बाजारातील ट्रेड टाईमिंग वाढवण्याच्या बाजूने आहे, परंतु बरेच लोक त्यास सहमत नाहीत. झिरोधाचे सीईओ नितीन कामथ यांनी ट्विटद्वारे आपलं मत व्यक्त केलं. हा निर्णय घेतल्यास त्याचा ट्रेडर्स वर विपरीत परिणाम होऊ शकतो, असं ते म्हणाले. वाढत्या ट्रेडिंगच्या वेळेमुळं कमी सहभाग आणि दीर्घकाळात तरलता समस्या उद्भवू शकतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा