पुरंदर, ७ जानेवारी २०२१: ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेजुरी पोलीस गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व ज्यांच्यावर यापूर्वी गुन्हे नोंद आहेत अशा लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचं जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी म्हटले आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आफवा पसरवणे किंवा त्या अफवांचे संदेश फॉरवर्ड करणे हा सुध्दा अपराध आहे. त्यामूळे कोणीही चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल. असा इशारा महाडिक यांनी दिला आहे.
काल दि.६ रोजी सायंकाळी सहा वाजता जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी नीरा पोलिस चौकीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवणारे उमेदवार, पॅनल प्रमुख ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये महाडिक यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक ही सौहार्दपूर्ण वातावरणात व्हवी, कोणताही भांडण-तंटा करून होऊ नये, म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना कोणीही चुकीच्या पद्धतीने प्रचार करू नये. निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या नियमानुसार प्रचार करावा. टीकाटिप्पणी करताना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये. निवडणुकी दरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाल्यास तातडीने गुन्हे दाखल करून घेतले जाणार आहेत.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ताजी चव्हाण, माजी सरपंच राजेश काकडे, माजी उपसरपंच विजय शिंदे, दीपक काकडे, बाळासाहेब भोसले, कल्याण जेधे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, नीरा विकास आघाडीचे मार्गदर्शक नाना जोशी, निरेचे पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, उमेदवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी नीरा विकास आघाडीच्यावतीने माजी सरपंच राजेश काकडे यांनी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारची आगळीक होणार नाही याबाबतची खात्री दिली. तर चव्हाण पॅनल कडून दत्ताजी चव्हाण यांनी पॅनलच्या कार्यकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम होणार नाही याबाबतची खात्री दिली. नीरा नीरा औट पोस्टचे उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले व संयमाने निवडणूक पार पाडण्याचे आवाहन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे