पंतप्रधान मोदींच्या हस्ते जालियनवाला बागच्या नवीन स्मारकाचे उद्घाटन

11
नवी दिल्ली, २९ ऑगस्ट २०२१: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे नूतनीकरण केलेलया जालियनवाला बाग स्मारक संकुलाचे  राष्ट्रार्पण केले. या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी स्मारकातील संग्रहालय दालनांचे उद्घाटनही केले. या कार्यक्रमात संकुलाच्या विकासासाठी सरकारने हाती घेतलेले अनेक विकास उपक्रम प्रदर्शित करण्यात आले. पंतप्रधानांनी पंजाबच्या शूर भूमीला आणि जालियनवाला बागच्या पवित्र मातीला वंदन केले. ज्यांच्यात पेटलेले स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग विझवण्यासाठी अभूतपूर्व अमानुषतेला सामोरे गेलेल्या भारतमातेच्या मुलांनाही त्यांनी सलाम केला.
या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, जालियनवाला बागच्या भिंतींवरील बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणांमध्ये आजही निष्पाप मुला -मुलींची, बंधू आणि भगिनींची स्वप्ने दिसत आहेत.शहीदी विहिरीने असंख्य माता भगिनींचे प्रेम आणि जीवन हिसकावून घेतले त्यांचे ही आपण आज स्मरण करत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी नमूद केले की, जालियनवाला बाग हे असे स्थान आहे ज्याने सरदार उधम सिंग, सरदार भगतसिंग यांसारख्या असंख्य क्रांतिकारकांना आणि लढवय्यांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती द्यायला प्रेरित केले.ते पुढे म्हणाले की, १३ एप्रिल १९१९ ची ती १० मिनिटे आपल्या स्वातंत्र्य संग्रामाची अजरामर कथा बनली आहे , ज्यामुळे आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू शकत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. अशा प्रसंगी, स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात  जालियनवाला बाग स्मारकाच्या आधुनिक स्वरूपाचे राष्ट्रार्पण ,आपल्या सर्वांसाठी मोठी प्रेरणादायी  संधी आहे, असे ते म्हणाले.
जालियनवाला बाग हत्याकांडापूर्वी या ठिकाणी पवित्र वैशाखीचे मेळे भरत असत, याचे पंतप्रधानांनी स्मरण केले. ‘सरबत दा भला’ या  भावनेने गुरु गोविंद सिंग जी खालसा पंथाची स्थापनाही याच दिवशी झाली.आपल्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी, हे नूतनीकरण केलेले जालियनवाला बाग स्मारक नवीन पिढीला या पवित्र स्थळाच्या इतिहासाची आठवण करून देईल आणि त्याच्या भूतकाळातून बरेच काही शिकण्याची प्रेरणा देईल.
पंतप्रधानांनी नमूद केले की, आपल्याला धडा देणाऱ्या  आणि आपल्याला पुढे जाण्याची दिशा दाखविणाऱ्या इतिहासाचे जतन करणे ही प्रत्येक राष्ट्राची जबाबदारी आहे. ते पुढे म्हणाले की, कोणत्याही देशाने आपल्या भूतकाळाच्या अशा भयावह  गोष्टींकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.  म्हणूनच, भारताने दरवर्षी १४ ऑगस्ट हा ‘फाळणी वेदना  स्मरण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. भारताने फाळणीच्यावेळी जालियनवाला बाग सारखी भयावह  घटना पाहिली. ते म्हणाले की, पंजाबचे लोक फाळणीचे सर्वात मोठे बळी आहेत. ते पुढे म्हणाले की, भारताच्या कानाकोपऱ्यात आणि विशेषत: पंजाबमधील कुटुंबांमध्ये फाळणीच्या वेळी जे घडले त्याची वेदना आपल्याला  अजूनही जाणवते.
आपल्या स्वातंत्र्याचा हा अमृत कालखंड  संपूर्ण देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या अमृत काळात  त्यांनी वारसा आणि विकास या दोन्ही गोष्टी पुढे नेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले पंजाबच्या भूमीने आपल्याला नेहमीच प्रेरणा दिली आहे आणि आज गरज  आहे की पंजाबने  प्रत्येक स्तरावर आणि प्रत्येक दिशेने प्रगती करावी.  यासाठी त्यांनी सर्वांना ‘सबका साथ, सबका विकास’ या भावनेने एकत्र काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी जालियनवाला बागच्या या भूमीला देशाला आपली उद्दिष्टे लवकरच  पूर्ण करण्याच्या  संकल्पांसाठी सतत ऊर्जा देत राहो अशा शुभेच्छा दिल्या.
केंद्रीय संस्कृती मंत्री, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज  मंत्री, सांस्कृतिक राज्यमंत्री, पंजाबचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, हरियाणा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री; पंजाबचे  लोकसभा आणि राज्यसभेतले खासदार, जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक  ट्रस्टचे सदस्य,आणि  इतर मान्यवर यावेळी  उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे