पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला केले संबोधित, ७१ हजार तरुणांना नियुक्तिपत्रांचे वाटप

नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर २०२२ : रोजगार मेळाव्याचा दुसरा टप्पा आज पार पडला. १० लाख तरुणांना सरकारी नोकरी देण्यासाठी सुरू झालेल्या या मेळाव्यात नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन माध्यमातून उपस्थितांना संबोधित केले व नोकरी मिळवण्यास पात्र ठरलेल्या तरुणांचे अभिनंदन केले. या मेळाव्यात ७१००० हून अधिक तरुणांना नियुक्तिपत्रे दिली गेली. मागील महिन्यात ७५००० नियुक्तिपत्रांचे वाटप करण्यात आले होते.

या रोजगार मेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “केंद्र सरकार सरकारी नोकऱ्यांमध्ये रोजगार देण्यासाठी मिशन मोडवर काम करीत आहेत. गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश राज्यांसह अनेक भाजपशासित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनीही असेच प्रयत्न केले आहेत. २८ नोव्हेंबर रोजी गोवा आणि त्रिपुरामध्ये अशाच प्रकारचा रोजगार मेळावा आयोजित केला जाईल. डबल इंजिन सरकार असल्याचा हा फायदा आहे. देशाने अमृत काळात प्रवेश केला आहे. आम्ही भारताचा विकास करण्याची शपथ घेतली आहे. या कार्यात तुम्ही सर्वजण सारथी बनवणार आहात. सर्व निवडक तरुणांसाठी ‘कर्मयोगी प्रारंभ’ हा विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.”भारत हे जगाचे उत्पादन केंद्र बनणार आहे. आमच्या सरकारने अंतराळ क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण करण्याची संधी दिली आहे. ज्यामध्ये ड्रोनद्वारे नोकऱ्यांचा समावेश केला जाईल. देशातील तरुणांनी नव्या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

भारतातील करोडो युवक हे आपल्या देशाची सर्वांत मोठी ताकद आहेत. राष्ट्र उभारणीसाठी आपल्या तरुणांची प्रतिभा आणि ऊर्जा ही केंद्र सरकारची सर्वांत मोठी प्राथमिकता आहे. आज भारत सेवा निर्यातीच्या बाबतीत जगातील एक मोठी शक्ती बनला आहे. तो लवकरच उत्पादनाचे केंद्र बनेल, असा विश्वास तज्ज्ञांना देखील आहे. तर सरकारने सुरू केलेल्या ‘कर्मयोगी भारत’ तंत्रज्ञान मंचाद्वारे ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याचा सर्व तरुणांनी जरूर लाभ करून घ्यावा. स्वतःचे कौशल्य वाढवावे व भविष्यातील करिअरमध्ये त्याचा फायदा करून घ्यावा, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा