पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मोरबी दौर्‍यावर

10

गुजरात, ३१ ऑक्टोबर २०२२: गुजरातमधल्या मोरबी इथला झुलता पूल कोसळून मोठी दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत आतापर्यंत १४० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालाय. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मोरबी दौर्‍यावर जाणार आहेत. यावेळी मोदी जखमींना रुग्णालयात जावून तर मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत.

दरम्यान, रविवारी संध्याकाळी मोरबी शहरातील माच्छू नदीवरील झुलता पूळ अचानक कोसळला. संध्याकाळी ६.३० वाजता ही दुर्घटना घडली. ब्रिटिशांच्या काळातील हा ब्रीज आहे. काही दिवसांपूर्वीच या पूलाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं पण त्याला अद्याप फिटनेस प्रमाणपत्र मिळाले नव्हते तरी देखील हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. दरम्यान, मोरबी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचं पोस्टमॉर्टम केलं जाणार नाही असा निर्णय गुजरात सरकारकडून घेण्यात आलाय.

मोदींचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७ एप्रिल २०१६ रोजीचा एक व्हिडीओ समोर आलाय. ३१ मार्च रोजी पश्चिम बंगालच्या कोलकात्यात एक निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला. त्यात २७ जणांचा मृत्यू तर ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. त्यावेळी मोदी यांनी उड्डाणपूल दुर्घटनेवरून राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केलं होतं.

काय म्हणाले होते मोदी?

निवडणुकीच्या दिवसांत पूल कोसळला आहे. हा देवानं लोकांना दिलेला संदेश आहे. आज हा पूल पडलाय. उद्या या (ममता बॅनर्जी) अशीच अवस्था संपूर्ण बंगालची करतील. त्यामुळं पश्चिम बंगालला वाचवा, असा संदेश देवानं या घटनेतून दिला आहे, असा शब्दांत मोदी यांनी राज्य सरकारवर टीका केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.