पुणे, ८ जुलै २०२३ : महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होऊन राजकीय चित्र बदलले आहे.यामुळे वेगवेगळ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीतून एक गट बाहेर पडून भाजपमध्ये सामील झालेले अजित पवार हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते वेगवेगळ्या प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (८जुलै) बिकानेरमध्ये ६३७ किमी लांबीच्या अमृतसर-जामनगर एक्सप्रेसवेचे उद्घाटन करणार आहेत.देशातील चार राज्यांना पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि गुजरात जोडणारा हा द्रुतगती मार्ग सर्वसामान्यांच्या जीवनात विकासाचे नवे पर्व सुरू करणारा ठरणार आहे.बिकानेरच्या पवित्र भूमीतून आज २५ हजार कोटींच्या विकासकामांची पंतप्रधानांनी भेट दिली आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर आज होणारी मोदींची सभा ऐकण्यासाठी भाजप कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता उत्सुक आहे.
त्याचबरोबर नरेंद्र मोदी आज तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात सुमारे ६,१०० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांच्या कामांचे उद्घाटन करणार आहेत.या वर्षातला मोदींचा तेलंगणातील हा तिसरा दौरा असून जानेवारी आणि एप्रिलमध्ये सुध्दा मोदींनी तेलंगणा राज्याला भेट दिली होती.आज मोदींचा दौरा असल्यामुळे बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. साडेतीन हजार पोलिस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर