नवी दिल्ली २१ जून २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे, अमेरिकेत भारताचा डंका वाजत आहे. या दौऱ्यात भारतीय व्यापार आणि उद्योगांना चालना मिळण्याची शक्यता असल्याने शेअर बाजारात आज आनंदाचे वातावरण पसरले आहे. भारतीय शेअर बाजाराने नवीन इतिहास रचला आहे. बुधवारच्या व्यापारी सत्रात शेअर बाजाराने नवीन विक्रम तयार केला. बीएसई सेन्सेक्स त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला. सकाळी सुरुवातीच्या सत्रातच भारतीय निर्देशांक ६३,५८८ रुपयांच्या नवीन ठिकाणी पोहचला. १ डिसेंबर २०२२ नंतर निर्देशांकाने ही नवीन गगन भरारी घेतली आहे. यामुळे इन्ट्रा-डेमध्ये अनेकांनी कमाई केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार चीनमधून झाल्यापासून अवघे जग चीनकडे संशयाच्या नजरेने पाहत आहे. गेल्या काही महिन्यापूर्वीच तिथे झिरो कोविड पॉलिसी हटविण्यात आली असून बाजार खुले करण्यात आले, पण तरीही अनेक जागतिक कंपन्यांनी चीन मधून काढता पाय घेत भारत आणि ईशान्य पूर्वेतील इंडोनेशिया, मलेशियाकडे आपला मोर्चा वळवला आहे आहे. भारतीय बँकिंग सिस्टिम मजबूत असल्याचे दिसून आले असुन भारतीय बाजारातील एकही मोठी बँक अद्याप बुडीत झाली नाही. त्यामुळे चीनऐवजी भारताकडून जगाला मोठ्या आशा आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी मोठे जागतिक प्रकल्प भारतात येण्याची शक्यता आहे.
बुधवारच्या व्यापारी सत्रात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी यासारख्या शेअर्सनी उसळी घेतली. तर श्रीराम फायनान्स, पीरामल एंटरप्राईजेस यासारख्या शेअर्समध्ये १० टक्के अप्पर सर्किट लागले. बाजारात गुंतवणूकदारांचा भरोसा वाढला असुन परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पुन्हा भारतीय बाजारात गुंतवणूक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचे सकारात्मक परिणाम दिसताच, बाजारात तेजीचे सत्र सुरु झाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताला लवकरच मोठी बातमी मिळण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर