विवादित नकाशामुळं पंतप्रधान ओली आपल्याच देशात वादाच्या भोवऱ्यात

10

काठमांडू, १९ सप्टेंबर २०२०: नेपाळच्या ओली सरकारनं अभ्यासक्रमात विवादित नकाशा समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला पण आता ते स्वतः अडचणीत सापडल्याचं दिसत आहे. भारतामधील कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधूरा हा भूभाग नेपाळमध्ये दर्शविणारा एक नवीन नकाशा नेपाळ सरकारनं जाहीर केला होता. याला नेपाळमधील मधेशी नेत्यांनी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचं तणावपूर्ण पाऊल म्हणून वर्णन केलंय.

नेपाळचे माजी गृह राज्यमंत्री म्हणाले, यामुळं दोन्ही देशांमधील वाद वाढतील

नेपाळचे माजी गृहराज्यमंत्री आणि नवलपरासीचे खासदार देवेंद्रराज कंडेल म्हणाले की नेपाळ सरकारनं घेतलेलं हे पाऊल या दोन्ही देशांमधील सुरू असलेले मतभेद आणखी तीव्र करेल. आम्ही सांस्कृतिक आणि धार्मिक कारणास्तव एकमेकांशी जोडलेले आहोत. परस्पर समन्वयानंतरच दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांनी काही पावलं उचलली पाहिजेत.

कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यानंही टीका केली

नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी कृषी विकास राज्यमंत्री गुलझारी यादव म्हणाले की, नेपाळ सरकारचं हे पाऊल मुलांना गोंधळात टाकणारं आहे. निरागस मुलांमध्ये भारताविरूद्ध द्वेष निर्माण करण्याचं नियोजन आहे. हे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही.

आमदार म्हणाले, मुलांच्या अभ्यासक्रमात असा बद्दल म्हणजे स्लो पॉयझन देणेच

नेपाळच्या भैरहवान मतदारसंघाचे आमदार संतोष पांडे म्हणाले की, नेपाळची आर्थिक संरचना ढासळली आहे. कोरोना ग्रस्त रूग्णांवर उपचार केले जात नाहीत. नेपाळ सरकार सार्वजनिक समस्या सोडविण्यात पूर्णपणे अपयशी ठरली. लोकांना मूळ मुद्यापासून दूर करण्यासाठी सरकार असे प्रयत्न करत आहे. अभ्यासक्रमात नवीन नकाशाचा समावेश करण्याचा निर्णय म्हणजे मुलांना स्लो पॉयझन देण्यासारखं आहे.

काय आहे वादाचं कारण

नेपाळच्या शिक्षण मंत्रालयानं नेपाळी ‘संपूर्ण सीमा स्वाध्याय सामग्री’ या पुस्तकाचं प्रकाशन केलेय. त्याचे अनावरण शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री गिरीराज मणी पोखरेल यांनी केलं. या पुस्तकात नेपाळ भारतीय कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख यासह ५४२ चौरस किलोमीटर क्षेत्राचं वर्णन केलंय. स्वाध्याय सामग्री नावाच्या शिक्षणमंत्र्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये नेपाळचं एकूण क्षेत्रफळ १,४७,६४१.२८ चौ.किमी आहे, परंतु पूर्वीच्या नकाशामध्ये नेपाळचे एकूण क्षेत्रफळ १,४७,१८१ आहे. नेपाळ शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या सत्रासाठी पुस्तकांचे वाटप करण्यात आलं आहे. पुढील सत्रामधून प्रकाशित होणाऱ्या पाठ्य पुस्तकांमध्ये त्याचा समावेश असणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे