नवी दिल्ली, ५ जून २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिल्ली येथील विज्ञान भवनात अमृत धरोहर योजना जाहीर करणार आहेत. या योजनेंतर्गत भारतातील ७५ रामसार स्थळावर पंतप्रधान लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे संपर्क साधून त्या अंतर्गत घेण्यात येणारे कार्यक्रम स्वतः पाहणार आहेत. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना पर्यावरणासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाईव्ह पाहण्यासह संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील १०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मिशन लाइफ अंतर्गत प्लास्टिकमुक्त अभयारण्य शपथ, अभयारण्य परिसर स्वच्छता, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
पर्यावरण दिनानिमित्त थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत विद्यार्थ्यांना चर्चा करता येणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील विधार्थी, पर्यावरणप्रेमी तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहन नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर