पंढरपूर, २६ सप्टेंबर २०२२ : राज्यात मागील काही दिवसापासून आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडाला आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यापासून राज्यातले राजकारण चांगलेच गरमागरम झाले. विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची जोड उठवली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने पाठपुरावा न केल्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रा बाहेर गेल्याचा आरोप केला होता. वेदांता फॉक्सकॉन पाठोपाठ आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. वेदांत-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिवाइस पार्क प्रकल्पाला मुकावे लागले आहे. यावरुन आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली.
देशातील काही राज्यात नजीकच्या काळात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामध्ये गुजरात आणि कर्नाटक मध्येही निवडणुका आहेत. महाराष्ट्रात या राज्यानंतर निवडणुका आहेत, त्यामुळे या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे प्रकल्प तिकडे जात असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे. निवडणुकीवेळी अप्रत्यक्षपणे भाजप विजयासाठी हे सर्व करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या या आरोपावर आधीच उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देताना म्हणाले की मला विरोधकांना एक विचारायचे आहे. मेडिकल डिव्हाईस पार्क महाराष्ट्रात येणार होता याचा एक चिठ्ठीवर तरी पुरावा तुम्ही दाखवणार का? अडीच वर्षात तुम्ही काहीच केले नाही. या काळात केवळ केंद्र सरकारला शिव्या द्यायच्या, एवढेच काम केले. आणि आता वाटेल ते मनात येईल तसे बोलत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर