संगमनेर, ४ फेब्रुवारी २०२३ : शेतीमधून बारमाही उत्पन्न मिळत नसल्याने घरची आर्थिक स्थिती नाजूक; मात्र तरीही शिकताना आर्थिक अडचणींवर मात करीत तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पानोडी येथील सोमनाथ बाळासाहेब जाधव या ३० वर्षीय तरुणाने सीए परीक्षेत यश संपादित केले. शेतीसह मेंढपाळ कुटुंबातील सोमनाथ याने मिळविलेल्या या प्रेरणादायी यशाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
सोमनाथचे गावात जाधव वस्तीवर जि.प. शाळेत प्राथमिक, सरदार थोरात विद्यालयात १० वीपर्यंत शिक्षण झाले. पुढे १२ वी कॉमर्स शाखेमधून ६५ टक्के गुण मिळविले. पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पुणे येथे पार्टटाईम काम करून शिक्षण घेतले. सोमनाथला अनेक आडचणी आल्या; परंतु मनात जिद्द होती. वडील मेंढीपालन करीत रिकाम्या वेळेत इतरांच्या शेतात नांगरणीसह शेती मशागत करून घरखर्च भागवायचे. उर्वरित रक्कम मुलाला चार्टड आकाउंटंट होण्यास प्रेरणा दिली.
यामुळे ग्रामस्थांनी सोमनाथ व त्याचे वडील यांचा जाहीर सत्कार समारंभ केला. यावेळी माजी पोलिस अधिकारी भाऊसाहेब चव्हाण, अशोकराव तळेकर, ॲड. सदाशिवराव थोरात, राजेंद्र जाधव, रावसाहेब घुगे, रवींद्र जाधव, संतोष चव्हाण, प्रा. दीपक जाधव, दत्तात्रय चव्हाण उपस्थित होते. सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले व सोमनाथला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर