इंदापूर ,२३ सप्टेंबर २०२० :इंदापूर तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी सुमारे ५२५ मि.मी.एवढी आहे. आज अखेर तालुक्यात जवळपास दुप्पट म्हणजे सुमारे ९५० ते १००० मि.मी. पाऊस झाला आहे. इंदापूर तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. त्यामुळे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत करावी,अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री ना.दादा भुसे यांच्याकडे मंगळवारी (दि.22) पत्राद्वारे केली आहे
इंदापूर तालुक्यात चालू आठवड्यात सोमवारी (दि.१४) व शुक्रवारी (दि.१८) रोजी रात्री जोरदार अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे, फळबागा, शेत जमिनीचे, पोल्ट्री फार्म व अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने हानी होऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले आहे.
एका दिवसात ६५ मि.मी. पेंक्षा अधिक पाऊस झाल्यास अतिवृष्टी समजली जाते. त्यामुळे प्रशासनाने ऊस, मका, बाजरी, चारा-पिके आणि डाळिंब, मोसंबी, पेरू, द्राक्ष आदी फळबागांचे पंचनामे तातडीने करावेत. तसेच बावडा परिसरात अनेक घरात पाणी शिरल्याने बाधित कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. काही ठिकाणी पोल्ट्री फार्म मध्ये पावसाचे पाणी घुसल्याने पक्षी मृत्युमुखी पडून नुकसान झाले आहे.तरी झालेल्या हानीचे तातडीने पंचनामे करून आपत्तीग्रस्त शेतकरी वर्गाला व नागरीकांना आर्थिक मदत करून दिलासा घ्यावा,अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी पत्रामध्ये केली आहे.
या पत्राची प्रत सचिव कृषी विभाग मंत्रालय मुंबई, आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे, जिल्हाधिकारी पुणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे, तहसीलदार इंदापूर, तालुका कृषी अधिकारी आदींना पाठविण्यात आली आहे.
दरम्यान,वेधशाळेने आणखी तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवली असल्याने शेतकरी व नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
बावडा-१०२३, शहाजीनगर-१००५ मि.मी. पाऊस !
बावडा येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याच्या पर्जन्यमापक केंद्रावर – १०२३ मि.मी., तर शहाजीनगर येथे नीरा भीमा साखर कारखान्याच्या पर्जन्यमापक केंद्रावर-१००५ मि.मी.एवढी पावसाची नोंद आज अखेर (दि.२२ सप्टें.) झाली आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतर पहिल्यांदाच असा विक्रमी पाऊस झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी : निखिल कणसे.