मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना विदेशातही झेड प्लस सुरक्षा द्या : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई, १ मार्च २०२३ : प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना भारतात झेड प्लस सुरक्षा आहे. मात्र, आता अंबानी कुटुंबीयांना विदेशातही झेड प्लस सुरक्षा मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयानेच यासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यानुसार, भारतासह विदेशातही आता मुकेश अंबानींच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येईल. मात्र, यासाठी होणारा संपूर्ण खर्च हा मुकेश अंबानी यांच्याकडूनच करण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

विकास साहा नावाच्या व्यक्तीने गेल्या वर्षी २९ जून रोजी त्रिपुरा उच्च न्यायालयात मुकेश अंबानींच्या सुरक्षेविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने केंद्राकडून उत्तर मागितले होते की, अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्या आधारावर सुरक्षा देण्यात आली; तसेच याचा तपशील मागविला होता.

त्यानंतर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. एका कुटुंबाला दिलेली सुरक्षा हा सार्वजनिक हिताचा मुद्दा नाही आणि अंबानींच्या सुरक्षेचा त्रिपुराशी काहीही संबंध नाही, असे केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. त्यानंतर त्रिपुरा उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांवर सर्वोच्च न्यायालयाने २२ जुलै रोजी स्थगिती दिली.

मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी केंद्रीय गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारला गेल्यावर्षीच न्यायालयाला सादर केला आणि अंबानी कुटुंबाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी असेही म्हटले होते की, अंबानी कुटुंबीयांना जगभरात धोका आहे.

त्यांनतर आता अंबानी कुटुंबाला सुरक्षा देण्यास विरोध हा जनहित याचिकेचा विषय होऊ शकत नाही, असेही सरकारने म्हटले होते. गेल्यावर्षीच सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करीत सुरक्षा कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. आता आदेशावर कोर्टाने अधिक स्पष्टता दिली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा