इस्लामाबाद, ११ मे २०२३: पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ चे उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी यांना इस्लामाबाद पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे. तेहरीक-ए-एन्साफचे उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी यांना अटक करून अज्ञात ठिकाणी नेण्यात आले आहे. शाह मेहमूद कुरेशी हे इम्रान खान यांच्या विश्वासातील सर्वांत महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत.
कुरेशी यांना इस्लामाबादमधील गिलगिट-बाल्टिस्तान हाऊस मधून ताब्यात घेण्यात आले. पंजाब आणि खैबर पख्तूनख्वामधील दंगली आणि जाळपोळ प्रकरणात कुरेशी हे पोलिसांना हवे होते. अटक करण्यापूर्वी कुरेशी यांनी पीटीआय कार्यकत्यांना देशातील खऱ्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. आपण काहीही चुकीचे केलेले नाही. पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या अटकेनंतर झालेल्या हिसंक आंदोलनात ५० जणांचा मृत्यू झाला आहे.
पीटीआय पक्षाच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आली आहे. त्यात फवाद चौधरी आणि असद उमर यांचा समावेश आहे. इम्रान खान यांना मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली होती. त्यांना काल दुपारी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या ताब्यात देण्यात आले. अल-कादीर ट्रस्ट प्रकरणात त्यांना आठ दिवस कोठडी सुनावण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर