नवी दिल्ली, ३० ऑक्टोबर २०२०: पब्जी हा गेम एक महिन्यापूर्वीच प्ले स्टोर आणि अॅपल स्टोरमधून हटवण्यात आला आहे. परंतु ज्या युजर्सनी यापूर्वीच हा गेम त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करुन ठेवला होता, त्यांच्या स्मार्टफोनमध्ये अजूनही हा गेम अॅक्टिव्ह होता. परंतु आजपासून हा गेम त्यांच्या मोबाईलमध्ये चालणार नाही. याबाबत कंपनीनं फेसबुक पोस्टद्वारे पुष्टीकरण दिलं आहे.
भारतात महिन्याभरापूर्वी सुरक्षेच्या कारणावरुन तब्बल ११८ चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. त्यामध्ये पब्जी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाईट या दोन गेमिंग अॅप्सचा समावेश होता. मात्र, असं असलं तरीदेखील ज्या युजर्सच्या मोबाईल मध्ये हे दोन्ही ॲप्स आधीपासूनच होते ते याचा वापर करू शकत होते. मात्र, आता पब्जी युजर्ससाठी ही निराशाजनक बातमी समोर आली आहे. पबजी मोबाइल गेमचे मालकी हक्क असणाऱ्या टॅन्सेंट गेम्स या कंपनीनं फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, “पबजी गेम भारतात पूर्णतः बंद केला जातोय, ही फार खेदाची बाब आहे”. यासोबत त्यांनी भारतातील पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाईट या गेमच्या चाहत्यांचे आणि गेमचे समर्थन करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.
कंपनीने म्हटलं आहे की, आमच्या युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवणं ही नेहमीच आमची प्राथमिकता राहिली आहे. आम्ही नेहमीच भारतात लागू असलेल्या डेटा संरक्षण कायद्यांचं आणि नियमांचं पालन केलं आहे. टॅन्सेंट गेम्स’नं निवेदनात असंही म्हटलं आहे की, आमच्या प्रायव्हसी पॉलिसित असं म्हटले आहे की, सर्व युजर्सची गेमप्ले माहिती पारदर्शक पद्धतीने प्रोसेस केली जाते. तसेच टॅन्टेंट कंपनी पबजी मोबाईल विकसित करणारी कंपनी पबजी कॉर्पोरेशनला (क्राफ्ट्स गेम यूनियनच्या मालकीची कंपनी) सर्व हक्क परत करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे