ठाणे, दि. १५ जुलै २०२०: महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची झळ बसली आहे. गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रांतील सुमारे २० ते २५ टक्के सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी दीड दिवसाचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडपात होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे गणेशोत्सव मंडळांचे म्हणणे आहे.
ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. राज्य सरकारने मुंबई परिसरातील गणेशोत्सव मंडळांसाठी यापूर्वीच काही सूचना जाहीर केल्या आहेत. गणेशमूर्तीची उंची चार फुटांपर्यंत मर्यादित असावी. तसेच ऑनलाइन दर्शनाची सोय करावी, गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, अशा विविध सूचनांचा यामध्ये सामावेश आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्य़ातील मंडळांनीही सरकारच्या या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.
ठाणे जिल्ह्यात सुमारे २ हजार ५०० नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यात १ हजार ५०० मंडळे ठाणे महापालिका क्षेत्रात येतात. यातील ७० ते ८० टक्के गणेश मंडळे ११ दिवस गणेशोत्सव साजरा करतात. मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग ठाणे जिल्ह्यात वाढत असल्याने भाविकांची गर्दी होऊन संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यात २० ते २५ टक्के गणेशोत्सव मंडळांनी उत्सव दीड दिवसांचा करण्याचा निर्णय घेतला आहे. जी गणेशोत्सव मंडळे १० दिवस गणपती साजरा करणार आहेत, ती मंडळे परिसरातील भाविकांसाठी फेसबुक किंवा विविध समाजमाध्यमांद्वारे गणपतीची ऑनलाइन आरती आणि दर्शन उपलब्ध करणार आहेत. यामुळे गर्दी टाळता येईल, असा दावा गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
या निर्णयाचे स्वागत हे फक्त गणपती मंडळांनी नव्हे तर भक्तांनी सुध्दा केलं आहे. परिस्थितीची जाणीव ठेऊन नागरिकांनी घरी राहूनच बाप्पाचे दर्शन घ्यायचे ठरवले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे