सार्वजनिक बांधकाम विभागाचे ‌अभियंते ‘हुशार’ पावसाने ओल्या झालेल्या रस्त्यावर करताहेत कारपेट, हाताने निघतोय डांबरीकरणाचा थर

जळगाव ५ डिसेंबर २०२३ : जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पद्मालय या शासकीय विश्रामगृहाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. मात्र हे डांबरीकरण निकृष्ट करण्यात येत असून हाताने डांबराचे थर निघत आहेत. या रस्त्यावर पायाने थोडा दाब देताच रस्ता उखडला जात आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी आंदोलन करून निकृष्ट रस्त्याचा भांडाफोड केला आहे.

शहरातील जयकिसनवाडीत असलेल्या पद्मालय या शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे डांबरीकरण करण्यात येत आहे. मात्र या डांबरीकरणाची जाडी ही बारीक व पातळ असल्याने तो थर हाताने सहजरित्या निघत आहेत. या रस्त्यावर पायाने थोडा दाब देवून क्रश केले तर डांबरीकरणाची सर्व खडी उखडत आहे. मनपाच्या शहर अभियंत्यांसह आयुक्त, बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनाही या निकृष्ट कामाची माहिती देत पाहणी करण्यास बोलावून या रस्त्याच्या निकृष्ट डांबरीकरणाबाबत सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी भांडाफोड करत आंदोलन केले.

याबाबत महापालिकेचे शहर अभियंता चंद्रकांत सोनगीरे यांच्याशी संपर्क साधला असता सार्वजनीक बांधकाम विभागाने या रस्त्यावर डांबरीकरणाचा एक थर मारला आहे. मध्यंतरी चार दिवस पाऊस पडल्याने काम बंद केले होते. आता त्यावर कारपेटचे काम करण्यात येत आहे. मात्र हे काम करत असताना रस्ता पावसामुळे ओला झाला आहे. रस्ता ओला असताना बांधकाम विभागाने त्यावर कारपेटचे काम सुरू केले आहे. त्यामुळे हा थर निघत आहे. याबाबत स्थळ पाहणी करून आयुक्तांना अहवाल सादर केला आहे, असे त्यांनी सांगितले.

रस्त्याच्या होत असलेल्या निकृष्ठ डांबरीकरणाबाबत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे करदात्या जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : डॉ.पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा