प्रकाशित साहित्य प्रवाहित राहते आणि चिरकाल टिकते : ‘साहित्य वैभव’च्या प्रकाशनप्रसंगी डॉ. उमाताई कुलकर्णी यांचे प्रतिपादन

निगडी, १९ फेब्रुवारी २०२३ : ”आजचा तरुण चांगलं लेखन करतोय. भले फॉर्म वेगळा असेल; पण विचार करून व्यक्त होतो आणि तो वाचतही असतो असं लक्षात येतं. त्याच्या लेखनाचा प्रवाह असाच सुरू राहायला हवा असेल तर त्याला ‘संस्कार भारती’च्या साहित्य विभागाने जोडून घेऊन त्यावर लेखन-वाचन संस्कारही करायला हवेत. तुमची संस्था ‘साहित्य वैभव’ या आजच्या अंकाच्या निमित्ताने ते बीज रोवत आहे, ही कौतुकाची गोष्ट आहे. आज तंत्रज्ञानाचा मनुष्याच्या मनावर फार मोठा प्रभाव आहे. हे तंत्र ज्याला अवगत झालंय तो काही ना काही सोशल मीडियावर व्यक्त होतो आणि आपल्या पोस्टवर किती लाइक्स मिळाल्या यातच समाधान मानतो. लाइक्स कमी मिळाले की नाराज होतो. यावर लेखन करणाऱ्याला झटपट प्रसिद्धीची सवय जडली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरचे लाइक्स ही तुमच्या लेखनाची पावती नाही. त्यांचे लेखन प्रिंट स्वरूपात प्रसिद्ध झाले पाहिजे तरच ते प्रकाशित साहित्य प्रवाहित राहते आणि चिरकाल टिकते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका, प्रसिद्ध कन्नड-मराठी अनुवादिका डॉ. उमाताई कुलकर्णी यांनी केले. त्या संस्कार भारती, पिंपरी-चिंचवड समितीच्या ‘साहित्य वैभव’ या अंकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होत्या. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी या तरुणाईला जोडून घेणे महत्त्वाचे आहे, असे सांगून त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, अशी मागणी करताना, आधी आपली मराठी भाषा आपण, कशी कशी, कुठे कुठे टिकविण्याचे प्रयत्न करतोय, त्यासाठी काय कष्ट घेतोय, याचा अंतर्मुख होऊन विचार करा, असा उपदेशही त्यांनी केला. अनुवादाबद्दल त्या म्हणाल्या, ”कोणत्याही साहित्यकृतीचा अनुवाद करताना लेखकाचा कस लागला पाहिजे. त्यासाठी दोन्ही भाषांची जाण व मेहनत करण्याची तयारी हवी.”

पिंपरी-चिंचवड समितीच्या साहित्य विभागाने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून भागातील लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘साहित्य वैभव’ अंक प्रकाशित केला. हे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका डॉ. उमाताई कुलकर्णी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १७ फेब्रुवारी) सावरकर सदन, प्राधिकरण, निगडी येथे झाले. यावेळी डॉ. नयना कासखेडीकर, सुषमाताई हिरेकेरूर, विशाखा कुलकर्णी, प्रांत उपाध्यक्षा सुवर्णताई बाग, अध्यक्ष सचिन काळभोर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. नयना ताई म्हणाल्या, ”संस्कार भारतीचे अखिल भारतीय असलेले संघटन, साहित्य आणि ललित कला यांच्या माध्यमातून काम करतेय. चित्र, नाट्य, शिल्प, नृत्य रंगावली आणि संगीत या ललित कलांचे जसे सादरीकरण होते; तसेच एखादा विशेषांक, पुस्तक, स्मरणिका हे या साहित्य विभागाचे दृश्य सादरीकरण आहे. ‘साहित्य वैभव’ अंक हे लेखकांचे व्यासपीठ आहे. ‘संस्कार भारती’च्या या अंकाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अशा उपक्रमाला पूर्वी कलांना जसा राजाश्रय असायचा तसे आता लोकांनी आश्रय दिला पाहिजे. तेव्हा असे उपक्रम यशस्वी होतील आणि ती जबाबदारी येथे उपस्थित असलेल्या सर्व लेखक व वाचकांची आहे.”

या अंकाला पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची प्रस्तावना लाभली आहे. या प्रकाशनाप्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. साहित्य विभागाच्या सर्वांनी मिळून मराठी भाषेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, यासाठी मालवणी भाषेत सादर केलेले गाऱ्हाणे रसिकांची दाद मिळवून गेले. साहित्य विभागाचे उपक्रम व काम चित्रफितीतून यावेळी दाखविण्यात आले.

पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक मान्यवर अतिथी लेखकांनी या अंकासाठी लेखन केले आहे. अंक प्रकाशन कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित सर्व अतिथी लेखकांचा ‘साहित्य विधे’च्या वतीने ‘अक्षरपुष्प – अ ते ज्ञ’ कविता भेट देऊन सत्कार करण्यात आला.

संस्कार भारती, पिंपरी-चिंचवड समिती सचिव सौ. लीना आढाव यांनी प्रास्ताविक केले, तर साहित्यविधा प्रमुख प्रणिता बोबडे यांनी साहित्य वैभव अंकाविषयीची संकल्पना सांगितली. अध्यक्ष श्री. सचिन काळभोर यांनी ‘साहित्य वैभव’ अंक व साहित्य सदस्यांचे शुभेच्छा देत कौतुक केले. सहविधा प्रमुख शुभदा दामले यांनी डॉ. उमाताई कुलकर्णी यांचा परिचय करून दिला, तर उपस्थित अतिथी लेखकांचा परिचय विधासदस्य सुचेता सहस्रबुद्धे, शर्वरी यरगट्टीकर, शिल्पा बिबीकर,
सुनीता कुलकर्णी, रोहिणी वेदपाठक यांनी करून दिला. अंक प्रकाशन कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड समिती उपाध्यक्ष श्री. हर्षद कुलकर्णी, श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर, कार्यकारिणी सदस्य श्री. सतीश वर्तक, कोषाध्यक्ष प्रचिती भिष्णूरकर, नृत्यविधा प्रमुख वरदा वैशंपायन, बालविधा प्रमुख शोभा पवार, चित्रकला सहविधा प्रमुख श्री. रमेश खडबडे उपस्थित होते.

सुरवातीला संस्कार भारती ध्येयगीतावर भावना गौड, श्रुती निंबर्गी यांनी नृत्य सादर केले. तर अंक प्रकाशनाची लक्षवेधी रांगोळी विधाप्रमुख अनिता रोकडे व सहविधा प्रमुख सुनीता कुलकर्णी यांनी काढली होती.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ. स्मिता कुलकर्णी यांनी केले. साहित्य सहविधा प्रमुख प्रिया जोग यांनी आभार मानले आणि मासिक संगीत सभा प्रमुख श्री. सारंग चिंचणीकर व सौ. सुधा लच्याण यांच्या सुरेल पसायदानाने सांगता झाली. ‘साहित्य वैभव’ अंकात लिखाण केलेले लेखक व रसिक प्रेक्षकांची कार्यक्रमास उत्स्फूर्त उपस्थिती होती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा