पुणे, २२ डिसेंबर २०२२ पुण्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. कसबा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. त्या ५७ वर्षाच्या होत्या. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी आज, ( दि. २२ ) दुपारी ३ः३० वाजता अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन, केसरी वाडा घेता येईल त्यानंतर वैकुंठ स्मशामभुमी येथे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
मुक्ता टिळक या लोकमान्य टिळक यांची पणतू सून होत्या. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या विद्यमान आमदार होत्या. त्या ४ वेळा नगरसेवक राहिल्या होत्या. मुक्ता टिळक यांनी सन २०१७ ते २०१९ या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले होते. काही दिवसांपूर्वी राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांना मतदानासाठी मुंबईत एअर अॅम्ब्युलन्सने नेण्यात आले होते.
भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर पुण्याबरोबरच इतर पक्षातील नेत्यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. कर्तव्यनिष्ठेला महत्त्व देणाऱ्या कार्यकर्त्या आज आमच्यातून गेल्या, अशा भावना पुणे भाजपचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.