भाजपला निवडणुकीची भीती? वसंत मोरेंचा तिरका सल्ला!

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या आदेशानंतर पुणे महापालिकेची निवडणूक पुन्हा एकदा थोडा वेळ थांबवल्या गेल्या असून यावरून राजकीय वातावरण तापलं आहे.

भाजपचा 100 जागांचा दावा

भाजपने 2017 च्या निवडणुकीप्रमाणेच पुन्हा 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा दावा केला आहे. परंतु हा दावा वादाला तोंड फोडणारा ठरला आहे. पुणे महानगरपालिकेत एकूण 165 जागा असून भाजपने यातील 100 आपल्याकडे निश्चित असल्याचे सांगितल्यामुळे विरोधकांनी थेट निशाणा साधला आहे.

वसंत मोरेंचा खोचक सल्ला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते वसंत मोरे यांनी भाजपला तिरका सल्ला देत म्हटले की, “जर 100 जागा तुम्ही आधीच ठरवल्या असतील, तर त्या नगरसेवकांची नावं जाहीर करा आणि किमान उरलेल्या 65 जागांवर तरी निवडणुका घ्या.” त्यांनी पुढे खोचक शैलीत सांगितले की, “वारंवार लांबणीवर टाकलेल्या निवडणुकांमुळे इच्छुक उमेदवार वैतागले आहेत आणि सततचा खर्च करून थकले आहेत.”

प्रभाग रचनेवरून वाद

अलीकडेच जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावरून भाजपला विरोधकांनी कोंडीत पकडलं होतं. प्रभागांमध्ये भाजपने आपल्या सोयीसाठी फेरफार केला असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांमुळे आधीच भाजप बचावात्मक भूमिकेत आला होता. त्यातच आता वसंत मोरेंच्या वक्तव्यामुळे निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील