Cops 24 Increased police patrol: पुणे शहर नेहमीच सुरक्षिततेसाठी ओळखले जाते, परंतु सध्या शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. पुणे पोलिसांनी शहरातील २ हजार ५७६ गुन्हेगारी हॉटस्पॉटची यादी तयार केली आहे. या हॉटस्पॉटवर दिवसातून ५ ते ६ वेळा गस्त घालण्यात येणार आहे. पुणे शहरात परिमंडळ ५ आणि परिमंडळ ३ या ठिकाणी सर्वाधिक गुन्हे घडत आहेत. यामुळे पुणे पोलिसांनी या भागावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
पुणे पोलिसांनी मागील काही दिवसांत ३० हजार गुन्हेगारांचा डेटा जमा केला आहे. पुणे पोलिसांकडून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी ठिकाणांची माहिती घेतली जात आहे. त्यासोबतच, शहरातील ‘रेड झोन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. या भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे.
शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी अनेक उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांमुळे शहरातील गुन्हेगारी बऱ्याच अंशी कमी झाली आहे. पुणे पोलिसांनी खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुणे पोलिसांनी २०२५ मध्ये खुनाच्या घटनांचे प्रमाण ६.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुणे पोलिसांनी ‘कॉप्स २४’ आणि स्थानिक पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून शहरात पोलिसांची उपस्थिती वाढवली आहे. झोपडपट्टीतील नशा करणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे. यामुळे या भागातील गुन्हेगारी सुद्धा नियंत्रणात येत आहे.
पुणे शहर पोलिसांच्या या प्रभावी उपाययोजनांमुळे शहरातील गुन्हेगारीला नक्कीच आळा बसेल, असा विश्वास पुणेकरांना आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे