पुणे : राज्यात सर्वाधिक हवा प्रदूषण असलेल्या शहरांच्या यादीमध्ये पुणे आणि पिंपरी -चिंचवड पहिल्या दहामध्ये आले आहे. बांधकाम प्रकल्प, वाढते शहरीकरण आणि वाहनांमुळे हवा प्रदूषण वाढले आहे.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेनुसार वर्षातील पाच महिने पुण्याची हवा रोगकारक असल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे.
याबाबत मंगळवारी ‘एक्यूआय एअर व्हिज्युअल’ या स्विस संस्थेने जगभरातील तीन हजार शहरांमध्ये गेल्या वर्षभरात २०१९ मध्ये केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
यामध्ये पुण्याचा २९९ वा क्रमांक लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने उत्तम, समाधानकारक, हवेच्या गुणवत्तेनुसार, आजारी माणसांसाठी धोकादायक, विषारी हवा, असे निकष निश्चित केले आहेत.
यामध्ये यादीनुसार पुणे शहरामध्ये एकही महिना उत्तम श्रेणीतील हवेची गुणवत्ता आढळून आलेली नाही. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात समाधानकारक श्रेणीतील हवेची गुणवत्ता नोंदवली आहे. तर मार्च आणि नोव्हेंबर या महिन्यात रोगट हवा होती.
दरम्यान, या अहवालात यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटांतील नागरिकांना श्वसनाचे गंभीर आजार होत असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.