पुणे, २ जुलै २०२३ : भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. या जागेवर पोटनिवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. दुसरीकडे कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर निवडणूक पार पडली आहे. खासदार बापट यांचे निधन होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. सध्या परिस्थिती पाहता लोकसभेचा कार्यकाळ आता जवळपास दहा महिने उरला आहे. त्यामुळे पुण्यातील लोकसभेची निवडणूक होणार की नाही? या प्रश्नाचे उत्तर अजून मिळाले नाही. त्याचवेळी दुसरीकडे विविध पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला आहे.
या सभागृहाचा कार्यकाळ संपण्यास दहा महिन्यांचा कालावधी आहे. निवडणूक जाहीर करून निवडणूक घेणे या प्रक्रियेसाठी महिनाभर लागू शकतो. यामुळे पुणे लोकसभेच्या नवनिर्विचित खासदारास फक्त सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. यामुळे ही निवडणूक टाळली जाणार की काय? अशी शंका आहे. तसेच विधान सभेच्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे भारतीय जनता पक्षाने सावध पावले उचलल्याचे दिसून येत आहे. भाजपकडून लोकसभेच्या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरु आहे. त्याचवेळी सामना होईल का? अशी शक्यता आहे.
कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक काही महिन्यांपूर्वीच झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीने ही जागा खेचून घेतली. कसबा पेठ हा भाजपचा मतदार संघ असताना त्यात भाजप उमेदवार विजयी होऊ शकला नाही. महाविकास आघाडीच्या या विजयानंतर पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु झाली. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर आपला दावा केला. भाजपमधील इच्छुकांनीही तयारी केली. परंतु ही निवडणूक होणार आहे की नाही? हा प्रश्न आहे. आता राजकीय तज्ज्ञांकडून या निवडणुकीची शक्यता धुसर असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. यामुळे पुणे लोकसभेचा सामना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत होईल, अशी शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर