पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गैरसोय वाढत आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत लोकल सेवा पूर्णपणे बंद असल्यामुळे विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. ट्रॅक दुरुस्तीच्या कामामुळे ही सेवा थांबवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना बसने प्रवास करावा लागत आहे.
रेल्वेचे ५ रुपयांचे तिकीट बसने प्रवास करताना ६० रुपयांपर्यंत वाढत आहे, त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. त्याचबरोबर कोविड काळात बंद झालेल्या सह्याद्री एक्स्प्रेस आणि कर्जत पॅसेंजर अद्याप सुरू न झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. रात्री १०.३० नंतर लोकल सेवा बंद होत असल्याने महिलांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. नागरिक आणि व्यावसायिक यांनी रेल्वे प्रशासनाकडे तातडीने सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे