पुण्यात महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत विशेष तपासणी!

पुणे महानगरपालिकेने ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत शहरातील सर्व महापालिका रुग्णालये, दवाखाने आणि आरोग्य मंदिरांमध्ये सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हे शिबिर होणार आहे.

या शिबिरात किशोरवयीन मुली, गर्भवती, स्तनदा माता आणि इतर महिलांची आरोग्य तपासणी, तसेच मधुमेह, रक्तदाब, कर्करोग आणि क्षयरोग यांसारख्या आजारांची तपासणी केली जाईल. नवरात्रोत्सवानिमित्त चतुश्रृंगी, तांबडी जोगेश्वरी आणि भवानी माता मंदिर परिसरातही विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये स्त्रीरोग, बालरोग, दंत आणि फिजिओथेरपी यांसारख्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणीचा लाभ घेता येईल. शिबिरासाठी येताना महिलांनी आधारकार्ड व रेशनकार्ड सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या संधीचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे