‘मसाज पार्लर’च्या नावाखाली देहविक्रीचा अड्डा खराडीत पोलिसांचा मोठा छापा!

शहरात ‘मसाज पार्लर’च्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांविरुद्ध पुणे पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून खराडी भागातील एका इमारतीत चालणाऱ्या मसाज पार्लरवर पोलिसांनी छापा टाकत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

पोलिसांना या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, चंदननगर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून प्रथम याची खातरजमा केली. खात्री होताच, त्वरित छापा टाकण्यात आला. या छाप्यात पोलिसांनी पार्लरमधून काही तरुणींना ताब्यात घेतले.

चौकशीमध्ये आरोपींनी या तरुणींना जास्त पैशांचे आमिष दाखवून देहविक्रीसाठी प्रवृत्त केल्याचे उघड झाले. संदीप चव्हाण, रोहित शिंदे, गोपाळ आणि स्वाती उर्फ श्वेता विजय शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

शहर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या गैरकृत्यांबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे आयुक्तांनी अशा पार्लर्सवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशांनंतर गेल्या चार दिवसांत पोलिसांनी तीन मसाज पार्लरवर छापे टाकून मोठे यश मिळवले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे