खेडच्या गुंड मयूर हजारेसह साथीदारांवर ‘मकोका’चा बडगा

धमकी देणे, गोळीबार करणे, खंडणी मागणे आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुंड मयूर हजारे आणि त्याच्या साथीदारांवर अखेर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी निर्णायक पाऊल उचलले आहे.

या प्रकरणात मयूर तानाजी हजारे, अक्षय बबन हजारे, मंगेश विलास दौंडकर, गौरव राम हजारे, राहुल उर्फ बंटी डफळ, गणेश दिलीप गोरडे, स्वप्नील रोहिदास गावडे आणि शुभम शिवाजी हजारे या आठ जणांवर ‘मकोका’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूर हजारे आणि त्याच्या टोळीवर खेड व शिक्रापूर पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दहशत माजविणे, बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणे, खून आणि खुनाचा प्रयत्न, तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी मागणे यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या टोळीने १० मे २०१५ रोजी खेड तालुक्यातील एका हॉटेलमध्ये बिल मागितल्याच्या कारणावरून हॉटेलचालकाला मारहाण केली होती आणि त्यानंतर दरमहा हप्ता मागून गोळीबार केला होता, असा एक गुन्हाही दाखल आहे.

या टोळीची वाढती दहशत आणि गंभीर गुन्ह्यांची नोंद लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी या टोळीवर ‘मकोका’ लावण्याचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. फुलारी यांनी या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली.

या कारवाईत पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी अमोल मांडते करत आहेत. ही कारवाई गुन्हेगारी प्रवृत्तींना एक कठोर संदेश देणारी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे