पुणे मनपा शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण, अन्यथा कारवाई

20

पुणे २५ फेब्रुवारी २०२५: महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरल्यास शिक्षकांना जबाबदार धरले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

असर अहवालातील धक्कादायक निष्कर्ष

‘असर’ या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. अहवालानुसार, इयत्ता सहावी ते आठवीतील ४० टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नाही, मूळ अक्षरे ओळखता येत नाहीत, आणि एक ते ९९ पर्यंतचे आकडे ओळखता येत नाहीत. तसेच, ५ ते १६ वयोगटातील निम्म्या विद्यार्थ्यांना अंकगणित जमत नसल्याचेही आढळून आले आहे. सरकारी शाळांमधील घटती प्रवेशसंख्या ही देखील चिंतेची बाब आहे.

शिक्षण परिषदेचे आयोजन

या पार्श्वभूमीवर, पुणे महानगरपालिकेने शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय शिक्षण परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. या परिषदेत शिक्षकांना मार्गदर्शन केले जाईल आणि त्यांच्या कार्यपद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.

गुणवत्ता न सुधारल्यास कारवाई

प्रशिक्षणांनंतरही जर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा झाली नाही, तर संबंधित शिक्षकांना जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले की, “महापालिका शिक्षणावर मोठा खर्च करत आहे, तरीही गुणवत्ता वाढत नसेल तर ते योग्य नाही. शिक्षकांनी गुणवत्तावाढीसाठी काय करावे, हे प्रशिक्षणातून सांगितले जाईल. पण, त्यानंतरही गुणवत्ता वाढणार नसेल, तर त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल.”

अतिरिक्त आयुक्तांची विभागीय स्तरावर परिषद

अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. स्वतः विभागीय स्तरावर शिक्षण परिषद घेणार आहेत. या शिक्षण मंडळाच्या भूमिकेमुळे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित होण्याची आशा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा