पुणे महापालिका निवडणुकीची तयारी जोरात प्रशासकीय यंत्रणा सज्ज!

पुणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर येत्या ४ सप्टेंबरपर्यंत हरकती-सूचना नोंदवता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पालिकेने विभागीय आयुक्तांकडे १७ मुख्य निवडणूक अधिकारी आणि ३४ सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची मागणी केली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, अर्ज स्वीकारणे, अर्जांची छाननी करणे आणि निकालाची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असेल.

पुणे महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे. शहरात एकूण १६५ नगरसेवक आणि ४१ प्रभाग आहेत. त्यामुळे, पालिकेने प्रत्येक दोन ते तीन प्रभागांसाठी एक मुख्य निवडणूक अधिकारी नेमण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच, निवडणुकीसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचेही नियोजन सुरू आहे.

प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून नोंदवलेल्या हरकती आणि सूचनांवर लवकरच सुनावणी होणार आहे. त्यासाठी प्राधिकृत अधिकारी नियुक्त केला जाणार आहे, जो हरकती नोंदवणाऱ्या नागरिकांशी संपर्क साधून त्यांना सुनावणीचे वेळापत्रक कळवेल. ही सुनावणी ४ ते १२ सप्टेंबर या कालावधीत होणार असून, जर काही नागरिकांची सुनावणी शिल्लक राहिली, तर त्यांच्यासाठी एक दिवस स्वतंत्रपणे ठेवण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे