राजकीय हस्तक्षेपामुळे पुणे प्रभाग रचनेवर प्रश्नचिन्ह, काँग्रेस-राष्ट्रवादीची न्यायालयात धाव!

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवरून राजकारण तापले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या रचनेत भाजपच्या हस्तक्षेपाचा गंभीर आरोप केला आहे. नैसर्गिक सीमांकडे दुर्लक्ष करून प्रभागांची तोडफोड करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होणार असल्याचे दोन्ही पक्षांनी म्हटले आहे. काही प्रभागात मागासवर्गीय वस्त्यांची जाणीवपूर्वक विभागणी करून सामाजिक न्यायाला धक्का पोहोचवला गेला आहे.

काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या प्रभागरचनेला विरोध दर्शवण्यासाठी हरकती नोंदवल्या असून, विरोध न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी या रचनेवर उपहासात्मक टीका करत म्हटले आहे की, ‘काही प्रभाग प्राण्यांच्या छायाचित्रांसारखे दिसतात’, आणि रचनेत मोठ्या प्रमाणात असमानता आहे.

एकाच प्रभागात ७० हजार तर दुसऱ्या प्रभागात दीड लाख मतदार असून, काही प्रभागांमध्ये चार पोलीस ठाणी आणि चार विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे, असे दाखले त्यांनी दिले आहेत. प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी दोन्ही पक्षांनी उघडपणे केली असून, आगामी काळात या वादामुळे पुण्यातील राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे