Pune Municipal Elections: Lohgaon-Wagholi Division Sparks Stir in Political Circles
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार झाल्यानंतर, लोहगाव आणि वाघोली या दोन महत्त्वाच्या भागांचं विभाजन झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संभाव्य विभाजनामुळे अनेकांनी आपले प्रभाग “सेफ” केल्याचं बोललं जात आहे, तर नवख्या उमेदवारांची मात्र कसोटी लागणार आहे.
पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांपैकी लोहगाव आणि वाघोली हे दोन भाग आहेत. आतापर्यंत या गावांची रचना स्वतंत्र होती, मात्र नवीन प्रभागरचनेमध्ये या गावांचं जुन्या प्रभागांशी एकत्रीकरण होणार असल्याचं कळतंय. यामुळेच लोहगाव-धानोरी-कळस आणि वाघोली-विमाननगर अशा नव्या प्रभागांची निर्मिती होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बदलांमुळे २०१७ च्या प्रभागरचनेमध्ये फारसे बदल होणार नाहीत, पण समाविष्ट गावांना जवळच्या जुन्या प्रभागांशी जोडण्यात येणार आहे.
या विभाजनामुळे वाघोलीतील नगर रस्त्याच्या डावीकडील भाग लोहगाव-विमाननगर प्रभागाला, तर उजवीकडील भाग खराडी-चंदननगर प्रभागाला जोडला जाईल, अशीही माहिती समोर येत आहे. यामुळे जुन्या प्रभाग क्र. ३ मधील विमाननगरसोबत लोहगाव बसथांब्यापासून वडगाव शिंदे रोडपर्यंतचा परिसर लोहगाव-विमाननगर प्रभागात समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
राजकीय वर्तुळात या बदलांमुळे मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. अनेक जाणकार आणि अनुभवी उमेदवारांनी आपले प्रभाग सुरक्षित करून घेतल्याचं बोललं जात आहे. यामध्ये दोन माजी आमदारांनी आपल्या बंधूंसाठी आणि भाजपच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने आपल्यासाठी सुरक्षित प्रभाग निवडल्याची चर्चा आहे. यामुळे काही उमेदवारांनी निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली असून, कुणी मोफत भाजीपाला वाटप करत आहे, तर कुणी देवदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करत आहेत.
मात्र, हे सर्व अंदाज आणि चर्चा आहेत. यावर अधिकृत शिक्कामोर्तब २२ ऑगस्टनंतरच होणार आहे. पुणे महापालिकेच्या अंतिम प्रभागरचनेचा आराखडा जाहीर झाल्यानंतरच प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत राजकीय इच्छुकांच्या मनात धाकधूक कायम राहणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































