School Bell Rings, But No Books! Students Suffer Due to Education Department’s Delay
वीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना उलटल्यानंतरही पुणे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी अजूनही पाठ्यपुस्तकांपासून वंचित आहेत. शासनाच्या समग्र शिक्षण अभियान अंतर्गत मोफत पुस्तके वेळेवर देण्याचे आश्वासन अपयशी ठरले असून, अनेक विद्यार्थ्यांच्या हातात अजूनही रिकाम्या बॅगा दिसत आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम सुरू झालेला असला तरी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया कमकुवत राहण्याची भीती शिक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
दरवर्षी शासनाच्या समग्र शिक्षण अभियानांतर्गत पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. यंदाही शासनाने वेळेत पुस्तकवाटप केल्याचा दावा केला असला, तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागांतील शाळांमध्ये ही अडचण अधिक तीव्र आहे. अनेक शाळांमध्ये फक्त काहीच वर्गांना पुस्तके मिळाल्याची माहिती असून, उर्वरित विद्यार्थी जुन्या पुस्तकांवर किंवा शिक्षकांच्या तोंडी मार्गदर्शनावर अवलंबून आहेत.
या अडचणीमागे यू-डायस प्रणालीतील अपूर्ण किंवा चुकीची माहिती, विद्यार्थ्यांची संख्या वेळेत अपडेट न होणे, शाळांकडून मागणीचा अभाव, छपाईनंतरच्या पुरवठ्यात दिरंगाई, आणि वाहतूक अडथळे ही प्रमुख कारणे समोर येत आहेत. काही पालकांनी आपल्या खर्चाने पुस्तके खरेदी केली असली, तरी अनेक गरीब कुटुंबांसाठी हा खर्च परवडणारा नाही.
परिणामी, अभ्यासक्रम सुरू असूनही विद्यार्थ्यांच्या हातात अभ्यासाची मूलभूत साधनं नसल्याने त्यांचा शैक्षणिक वेग कमी होतो आहे. शिक्षणासारख्या मूलभूत गरजेसाठीही शासनाच्या निष्काळजीपणामुळे वाट पाहावी लागणे, हे दुर्दैवी आहे. या समस्येकडे शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे असून, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ही दिरंगाई थांबवणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































