पुणे- नगर महामार्गालगत कचऱ्याचे साम्राज्य

शिक्रापूर : सणसवाडी (ता.शिरूर) येथे पुणे- नगर महामार्गालगत परिसरातील हॉटेल व्यावसायिकांकडून रात्रीच्यावेळी रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
सणसवाडीसह परिसरात हॉटेल व इतर अनेक व्यावसायिकांचे जाळे निर्माण झाले आहे. हॉटेलमधून गोळा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हॉटेल व्यावसायिक दक्षता घेत नाहीत. हा कचरा खुलेआम रस्त्याकडेला टाकून देत आहेत. हॉटेलमधून गोळा होणारा शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा कचरा हॉटेल व्यावसायिकांकडून पुणे- नगर रस्त्याच्या कडेला टाकून दिला जात आहे. यामुळे रस्त्याच्या कडेला घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
रस्त्याच्याकडेला टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे याठिकाणी अन्नाच्या शोधात कुत्रे आल्यामुळे कुत्र्यांच्या भांडणातून काही कुत्रे अचानकपणे रस्त्यावर पळत आल्यामुळे अनेक दुचाकी चालाकांचे अपघात झाले आहेत.
दुचाकी चालक गंभीर जखमी झाले आहेत. या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना कसलेही भय राहिलेले नाही. रस्त्याच्या कडेला टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे याठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेची आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा