व्यसनाधीनता रोखण्यासाठी सर्वांनीच जागरूक राहणे आवश्यक, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमारांचे आवाहन

पुणे २६ जून २०२३: समाजातील वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी सर्वांनीच जागरूक होणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती व प्रबोधनाची गरज असून पुणे पोलिसांच्या वतीने व्यसनमुक्ती या विषयावर, मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज असल्याचे मत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी व्यक्त केले. पुणे शहर पोलिसांच्या वतीने परिमंडळ ४ विभागात, व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त रितेश कुमार बोलत होते.

या कार्यक्रमाला अप्पर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, या उपक्रमाचे संयोजक पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्यासह परिमंडळ ४ मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी-कर्मचारी तसेच सायकल प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागतिक व्यसनमुक्ती दिनानिमित्त पुणे शहर पोलिसांच्या वतीने परिमंडळ चार विभागात, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या संकल्पनेतून व्यसनमुक्ती जनजागृती अभियान सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच नागरिकांचे व्यसन विरोधी विचार, या विषयावर मुक्तांगण व्यसनमुक्ती संस्था तसेच इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती व प्रबोधन सुरू आहे. त्यासाठी निबंध, चित्रकला व घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असुन पथनाट्यासह विविध उपक्रमातून व्यसनाचे धोके समजावून सांगण्यात येतायत. व्यसनाधीनतेमुळे वाढती गुन्हेगारी तसेच इतर सामाजिक प्रश्नांवर उपाययोजना, या गंभीर विषयावर पुणे पोलिसांच्या वतीने आगामी काळात, मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती देखील पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी यावेळी दिली.

या अभीयानाच्या निमित्ताने रविवारी सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आगाखान पॅलेस येथून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये, पुणे शहर पोलिसांसह सनराईज सायकलिंग ग्रुप तसेच पुणे शहरातील सायकल प्रेमी, असे सुमारे दीड हजार सायकलपटू या जनजागृती रॅलीत सहभागी झालेले. येरवडा, विश्रांतवाडी, खडकी, चतुश्रुंगी विभागातून निघालेल्या या रॅलीचा समारोप पोलीस मुख्यालय शिवाजीनगर या ठिकाणी करण्यात आला. मुक्तांगण संस्थेचे निहाल हसबनीस, पुणे महापालिका सायकल क्लबचे नरेंद्र साळुंखे, सायकल प्रेमी डॉ.सुभाष कोकणे, डॉ.सुरेखा कोकणे, अ‍ॅड.नीरज बागवे यांचा सायकल रॅलीमध्ये सहभाग होता.

सर्वात कमी वयाच्या आरोही संदीप गायकवाड (वय ९) व प्रथम ठक्कर (वय १०) यांच्यासह सर्वात ज्येष्ठ वयाचे कर्नल आपटे (वय ८०) यांच्या सायकल रॅलीतील सहभागाबद्दल पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. पुणे शहरातील एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत व्यसनमुक्ती विषयी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले, सूत्रसंचालन विवेक देव यांनी तर आभार अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी मानले

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा