पुण्यात सत्ताधारी नेत्याच्या कार्यकर्त्यामुळे बार प्रकरण गोंधळात

पुण्यातील विमाननगर परिसरात सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याच्या कार्यकर्त्याने धुमाकूळ घातल्याची चर्चा आहे. “मी त्या नेत्याचा पीए आहे, या बारवर कारवाई करा,” असे सांगून तो संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचे समोर आले आहे.

या कार्यकर्त्यावर यापूर्वी विमानतळ, मुंढवा आणि कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. तरीदेखील तो प्रशासनाला धमकावत असून, अधिकारी कारवाई करण्यास घाबरत आहेत.

या कार्यकर्त्याने एका बारला अडचणीत आणण्यासाठी बनावट आधार कार्ड तयार करून एका अल्पवयीन मुलीला ग्राहक म्हणून पाठवले. तिच्या मित्राने व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर टाकला आणि बारमध्ये अल्पवयीनांना दारू दिल्याचा आरोप केला.

बार मालकांनी सर्व पुरावे दाखवून आपले निर्दोषत्व सिद्ध केले. पण या घटनेमुळे त्यांचा बार काही दिवस बंद राहिला आणि मोठे आर्थिक नुकसान झाले. पोलिसांनी अजूनही त्या मुलीची चौकशी केलेली नाही.

या कार्यकर्त्याने पूर्वी एका नेत्याचे बॅनर शहरभर लावले होते, मात्र संबंधित नेत्याने सांगितले की “तो माझा कार्यकर्ता नाही.” तरीही तो नेत्याचे नाव वापरून विविध हॉटेल्स आणि बारमध्ये हस्तक्षेप करत आहे. स्थानिक नागरिकांनी याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील