गणेशोत्सवात साधला मुहूर्त! सुट्ट्या आणि पितृ पंधरवड्यामुळे दस्त नोंदणीसाठी विक्रमी गर्दी.

सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या पितृ पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात दस्त नोंदणीसाठी नागरिकांनी दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी केली होती. गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी, गणेशोत्सवाचा शुभ मुहूर्त साधण्यासाठी अनेक नागरिकांनी सदनिका, दुकाने आणि जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार नोंदवण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे नेहमीपेक्षा अधिक दस्त नोंदवले गेल्याने कार्यालयांमध्ये कामाचा ताण वाढला.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात एकूण २७ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये एरवी दिवसाला सरासरी १,२०० दस्त नोंदवले जातात. मात्र, या दिवशी दुपारीच एक हजाराहून अधिक दस्त नोंदवले गेले, आणि रात्रीपर्यंत हा आकडा दीड हजाराच्या पुढे गेला.
शुक्रवारी (५ सप्टेंबर) ईद-ए-मिलादची सुट्टी, शनिवारी (६ सप्टेंबर) अनंत चतुर्दशी आणि त्यानंतर रविवार (७ सप्टेंबर) यामुळे सलग तीन दिवस सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. सोमवारपासून (८ सप्टेंबर) पितृ पंधरवडा सुरू होत असल्याने अनेक जण या काळात शुभकार्य टाळतात. त्यामुळेच सुट्ट्यांपूर्वी सर्व व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला.

वाढलेली गर्दी लक्षात घेता, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयांची वेळ दीड तासांनी वाढवण्यात आली. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या या निर्णयामुळे दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची सोय झाली आणि अनेक महत्त्वपूर्ण व्यवहार वेळेत पूर्ण झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे