पुणे शहरालगतच्या प्रस्तावित रिंग रोडमधील जमिनीच्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांसाठी नागरिकांकडून लाच मागणाऱ्या तीन महिला तलाठ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे. हवेली तहसीलदार कार्यालयासमोर गुरुवारी ही कारवाई करण्यात आली असून, तिन्ही महिला तलाठ्यांविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत प्रेरणा बबन पारधी (सांगरूण), दीपाली दिलीप पासलकर (बहुली) आणि शारदादेवी पुरुषोत्तम पाटील (खडकवाडी) यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
तक्रारदाराने ACB कडे दिलेल्या तक्रारीनुसार, तलाठ्यांनी सरकारी फीव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम लाच म्हणून मागितली होती. पडताळणीदरम्यान, तलाठ्यांनी आधीच काही रक्कम घेतल्याचे कबूल केले आणि त्याच वेळी अतिरिक्त पैसे घेण्यासाठी सापळा रचला होता. प्रेरणा पारधी, दीपाली पासलकर आणि शारदादेवी पाटील यांनी अनुक्रमे १६,४००, ४,९१० आणि १,५२० रुपये लाच मागितली होती.
या कारवाईनंतर तिन्ही तलाठ्यांच्या घरांची झडती घेण्यात आली आणि सरकारी कामकाजातील भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यात ACB यशस्वी झाला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ACB च्या पथकाने ही कारवाई करून भ्रष्टाचारावर ठोस पाऊल उचलले आहे, ज्यामुळे शासकीय कामकाज अधिक पारदर्शक आणि जबाबदारीपूर्ण होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे













































