पुणे – उपमुख्यमंत्र्यांचा नंबर खंडणीसाठी वापरल्याप्रकरणी सहा जणांना अटक

पुणे, 15 जानेवारी 2022: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन नंबर वापरून शहरातील एका बिल्डरशी संपर्क साधून त्याच्याकडून 20 लाख रुपयांची खंडणी घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आलीय. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, गुन्हे शाखेनं सापळा रचून गुरुवारी बिल्डरकडून दोन लाख रुपये घेतल्यानंतर आरोपीला पकडलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीनं फिर्यादीला कॉल करण्यासाठी “फेक कॉल” ऍप्लिकेशनवर पवार यांचा नंबर वापरला आणि उपमुख्यमंत्र्यांचा कर्मचारी असल्याची बतावणी केली.

नवनाथ चोरमले, सौरभ काकडे, सुनील वाघमारे, किरण काकडे, चैतन्य वाघमारे आणि आकाश निकाळजे अशी आरोपींची नावे आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “बिल्डरने योग्य प्रक्रियेनंतर 1997 मध्ये चोरमले यांच्या आजोबांकडून जमीन खरेदी केली होती. चोरमले यांनी नुकतीच बिल्डरकडे नुकसान भरपाई मागितली आणि दावा दाखल केला. चोरमले यांनी पवार यांच्या स्वीय सहाय्यकाला (पीए) ओळखत असल्याचा दावा काकडे यांना केला, त्यांनी मदतीची ऑफर दिली आणि पवार यांच्या पीएला बिल्डरला फोन करण्यास सांगण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर त्यांनी बनावट कॉल अॅपवरून पवार यांचा फोन नंबर वापरून बिल्डरला फोन केला.

“बिल्डरच्या सहाय्यकानं फोन करणारे पवार असल्याचं समजून फोन उचलला. काकडे यांनी पवारांचे पीए अशी ओळख करून देत चोरमले यांच्याशी ‘सेटल’ करण्याच्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्र्यांच्या फोनवरून फोन आला की नाही हे जाणून घ्यायचं होतं. त्यानंतर बिल्डरने चोरमले यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी केली.

“आरोपीला 2 लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आलं. तपासादरम्यान काकडेनं बनावट कॉल अॅपद्वारे पवार यांचा नंबर वापरल्याचे उघड झालं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा