लोणी काळभोर : कदम वाकवस्ती (ता.हवेली) येथे पुणे- सोलापूर महामार्गालगत ओव्हर ब्रिजच्या परिसरातील हॉटेल व्यावसायिकांकडून रात्रीच्यावेळी रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
सध्या कोरोनाच्या संसर्गजन्य पसरत असल्याने आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे आशा अनेक गोष्टी शासनाकडून सांगण्यात येत आहे. पण कदम वाकवस्ती परिसरात हॉटेल व इतर अनेक व्यावसायिकांचे जाळे निर्माण झाले आहे. हॉटेलमधून गोळा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हॉटेल व्यावसायिक दक्षता घेत नाहीत. हा कचरा खुलेआम रस्त्याच्याकडेला टाकून देत आहेत. हॉटेलमधून गोळा होणारा शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा कचरा हॉटेल व्यावसायिकांकडून पुणे- सोलापूर रस्त्याच्या कडेला टाकून दिला जात आहे. व त्याचा वास उग्र येत असल्याने येथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.
यामुळे रस्त्याच्या कडेला घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
रस्त्याच्याकडेला टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे याठिकाणी अन्नाच्या शोधात कुत्रे आल्यामुळे कुत्र्यांच्या भांडणातून काही कुत्रे अचानकपणे रस्त्यावर पळत आल्यामुळे अनेक दुचाकी चालाकांचे अपघात झाले आहेत. दुचाकी चालक गंभीर जखमी झाले आहेत. या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना कसलेही भय राहिलेले नाही. रस्त्याच्या कडेला टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.