पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कामावरून काढल्याचा राग मनात ठेवून दोन कामगारांनी आपल्या सुपरवायझरच्या तीन वर्षांच्या मुलीचं अपहरण केलं. या घटनेमुळे विमाननगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार शिवशंकर कुमार पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी कशीश (वय ३) ही २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी अचानक बेपत्ता झाली. प्राथमिक तपासात प्रिन्स पॉल (२५) आणि ओमनारायण पासवान (२०) या दोन माजी कामगारांची नावे पुढे आली. कामावरून काढल्याचा राग काढण्यासाठीच त्यांनी मुलीचे अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आला.
तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू झाला. आरोपी प्रथम तळेगाव दाभाडे, नंतर लोणावळा आणि त्यानंतर रेल्वे मार्गावर असल्याचे आढळले.
दरम्यान, आरोपी इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी रेल्वे प्रशासनाला सतर्क केले. संयुक्त कारवाईत कल्याण रेल्वे स्थानकावर दोन्ही आरोपींना पकडण्यात आले. चिमुकली कशीश हिला सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आलं.
या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील













































