पुणे शहरात महिलांवरील अत्याचारांच्या तिन्ही धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. स्वारगेट पोलिसांनी विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एका शिकवणी चालकाला अटक केली आहे. सुरेश दौलत रौंदळ (वय ४६, रा. गौरव राज बिल्डिंग, दत्तनगर, आंबेगाव, कात्रज) असे आरोपीचे नाव असून, तो स्वारगेट परिसरात खासगी शिकवणी चालवत होता.
गुरुवारी सकाळी वर्गात विद्यार्थिनी एकटी असताना रौंदळने तिच्याशी अश्लील संवाद साधत अनुचित वर्तन केल्याचा आरोप आहे. घाबरलेल्या विद्यार्थिनीने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. स्वारगेट पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर पोक्सो कायदा आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, वाघोली येथे तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून रवी राजकुमार कस्तुरे (वय २५, रा. संत तुकारानगर, खराडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने ओळखीचा फायदा घेत धमकावत बलात्कार केला, अशी तक्रार पीडितेने दिली आहे.
तर नांदेड सिटी पोलिस ठाण्यात विवाहाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याचा आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याशिवाय, सहकारनगर पोलिसांनी कॉलेज तरुणीला सतत धमकावणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरुणीने संबंध तोडल्यानंतर आरोपी तिचा पाठलाग करत त्रास देत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील












































