दुबई, १९ ऑक्टोंबर २०२०: आयपीएलच्या १३ व्या सत्रातील ३६ व्या सामन्याच्या दुसर्या सुपर ओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने (केएक्सआयपी) विजय मिळविला. त्यांनी मुंबई इंडियन्स (एमआय) ने देलेल्या आव्हानावर मात केली. रविवारी रात्री दुबईमध्ये १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने २० षटकांत १७६/६ धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईनेही १७६/६ धावा केल्या होत्या.
पहिले सुपर ओव्हर ५-५ धावांनी बरोबरीत होते. यानंतर दुसऱ्या सुपर ओवरमध्ये पंजाबने जबरदस्त विजय मिळविला. एका सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळल्या जाणे म्हणजे क्रिकेटच्या इतिहासात अनोखं होतं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रविवारी आयपीएलच्या ३५ व्या सामन्याचा निकालही सुपर ओव्हरसह लागला. दिवसाच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा सुपर ओव्हर मध्ये पराभव केला.
प्रथम सुपर ओव्हर
मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सुपरओव्हर टाकताना एका षटकात फक्त ५ धावा देत भेदक मारा केला. या षटकात बुमराहने २ बळीही मिळवले. त्यामुळे विजयासाठी अवघ्या ६ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईला विजयासाठी चांगली संधी होती. परंतू अनुभवी मोहम्मद शमीने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत मुंबईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी २ धावा हव्या असताना क्विंटन डी-कॉक धावबाद झाला आणि पहिली सुपरओव्हर अनिर्णित झाली.
दुसरी सुपर ओव्हर
दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड जोडी मैदानात उतरली. पोलार्डने फटकेबाजी करत मुंबईला दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये ११ धावा काढून दिल्या. विजयासाठी आवश्यक असलेल्या १२ धावांचं आव्हान पंजाबकडून ख्रिस गेल आणि मयांक अग्रवाल मैदानात उतरले. मुंबईने ट्रेंट बोल्टला दुसरी सुपरओव्हर टाकण्याची संधी दिली. बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत गेलने धडाकेबाज सुरुवात केली. यानंतर मयांक अग्रवालने गेलचा कित्ता गिरवत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे