कर्नाटक, १६ ऑक्टोबर, २०२२ : सध्या राहुल गांधी भारत जोडोच्या यात्रेवर आहेत. या यात्रेदरम्यान राहुल गांधी आज कर्नाटकात बोलत होते. या भाषणादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोपांच्या फैरी झाडल्या. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला.
त्यांनी सांगितलं की, मला असं वाटलं की ३५०० किलोमीटर चालत जाणे सोपे काम नाही. पण जेव्हा मी चालायला सुरुवात केल्यानंतर मला पायी चालत जाणं खूप सोपं वाटत गेलं. असं वाटत होतं की, कुठली तरी शक्ती मला मागून पुढे चालण्यासाठी प्रेरित करत आहे. जेव्हा मी दमतो आहे, असं वाटतं तेव्हा कोणीतरी धावत येतं आणि उत्साह देऊन जातं. त्यांच्या शब्दांनी जोश येतो आणि मी पुढे चालत जातो. अशा शब्दांनी त्यांनी जनतेला प्रेरित केलं.
यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना गुन्हेगार ठरवताना सांगितलं की, तरुण पिढी नोकरीसाठी लढत आहे. पण त्यांना नोकरी मिळत नाही. ते केवळ सरकारी नोकरीसाठी तडफडत राहतात. मात्र बॅंकेत घोटाळा, असिस्टंट मॅनेजरच्या जागेसाठी घोटाळा असल्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. त्याचमुळे आता कर्नाटक सरकारला ४० टक्क्याचे सरकार म्हणून नाव दिलं गेलं आहे. या जनतेने सगळ्यात जास्त महागाईला तोंड दिलं आहे. यांना संकटात टाकण्यासाठी केवळ मोदी सरकार जबाबदार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहे. त्यांच्या आत्महत्या अजूनही सुरु आहे. मोदी सरकारच्या काळात नोटबंदी, जीएसटी आणि कोविड काळात साडे बारा करोड लोक बेरोजगार झाले, अशांना कधी रोजगार मिळणार ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मग मोदी सरकार नक्की काय करत आहे, हे पहाणं खूप गरजेचं आहे. अन्यथा भारत देशाचे नुकसान होईल असं मत राहुल गांधी यांनी या य़ात्रेदरम्यान मांडलं.
आता या भाषणावर मोदी सरकार काय उत्तर देणार हे मात्र ऐकणं आणि पहाणं गरजेचं ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस