श्रीनगरमध्ये पक्षाच्या कार्यालयात राहुल गांधी यांनी फडकवला तिरंगा

श्रीनगर, ३० जानेवारी २०२३ :काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेले पाच महिने सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ पदयात्रेचा समारोप आज दुपारी श्रीनगरमध्ये होत आहे. यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांनी भर बर्फवृष्टीमध्ये मौलाना आझाद रोडवरील पक्षाच्या मुख्यालयात तिरंगा फडकवला. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर जाहीर सभेनंतर या मोर्चाची आज सांगता होणार आहे.

या जाहीर सभेला २३ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. श्रीनगर आणि इतर ठिकाणी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अशा स्थितीत जाहीर सभा पुढे ढकलण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे. मात्र याला सध्या कोणत्याही नेत्याने दुजोरा दिलेला नाही.

दरम्यान, रविवारी श्रीनगरमधील पंथा पार्कपासून यात्रा सुरू झाली आणि बोलव्हर्ड रोडवरील नेहरू पार्कमध्ये पदयात्रा संपली. राहुल गांधींनी त्यानंतर तिरंगा फडकवला. या वेळी प्रियांका गांधीही उपस्थित होत्या.

या पदयात्रेने १२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतून ४ हजार ८० किलोमीटरचा पायी प्रवास केला. राहुल गांधींनी या यात्रेदरम्यान १२ जाहीर सभा, १०० कोपरा सभा, १३ पत्रकार परिषदा घेतल्या. त्याचबरोबर पदयात्रेत चालता-चालता त्यांनी २७५ महत्त्वाच्या व्यक्तींशी संवाद साधला आणि १०० ठिकाणी भेटी देऊन तिथे बसून जनतेशी संवाद साधला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा