राहुल गांधींची तीन दिवसांत 27 तास चौकशी, उद्या पुन्हा होणार चौकशी

नवी दिल्ली, 16 जून 2022: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीची प्रक्रिया वाढत आहे. सोमवार ते बुधवार या 3 दिवसांत ईडीने राहुल यांची तब्बल 27 तास चौकशी केली. तपास यंत्रणेने त्यांना शुक्रवारी पुन्हा प्रश्नोत्तरासाठी बोलावलंय.

सोमवारी, जिथे ईडीने काँग्रेस नेत्याची सुमारे 8.30 तास चौकशी केली. त्याचवेळी मंगळवारी ही चौकशी 10 तासांहून अधिक काळ चालली. बुधवारी ईडीची राहुल यांची जवळपास 9 तास चौकशी झाली. यानंतर त्यांना शुक्रवारी पुन्हा हजर राहण्यास सांगण्यात आले.

चौकशीला जास्त वेळ का लागतोय?

ईडीशी संबंधित सूत्रांचं म्हणणं आहे की, राहुल गांधी यांच्या चौकशीत गेल्या 2 दिवसांत 25 ते 30 प्रश्न विचारण्यात आले आहेत. एजन्सीचं म्हणणं आहे की काँग्रेस नेते त्यांच्या प्रश्नांना नेमकं तेच उत्तर देत आहेत. प्रश्नोत्तराची प्रक्रियाही अत्यंत संथ आहे. वास्तविक मंगळवारीच चौकशी संपावी अशी राहुल यांची इच्छा होती, परंतु ईडीकडे अजूनही काही प्रश्न शिल्लक आहेत.

अनेक राज्यांत काँग्रेसची निदर्शने

गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते राहुल यांच्या चौकशीच्या विरोधात आंदोलन करत असले तरी बुधवारी हा विरोध जोरदार होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयासमोर टायर जाळले. अशोक गेहलोत, दिग्विजय सिंह, सचिन पायलट यांच्यासह अनेक नेते बुधवारी आंदोलनासाठी दिल्लीत उपस्थित होते. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात जाणाऱ्या सचिन पायलट यांना नरेला पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. रात्री उशिरापर्यंत त्यांची सुटका झाली नव्हती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा