राजस्थानमधून राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेस सुरुवात

झालवार (राजस्थान), ६ डिसेंबर २०२२ :काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या पक्ष मजबूत करण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रा करत आहेत. यावेळी ही यात्रा एकमेव काँग्रेसशासित असलेले ‘राजस्थान’ या राज्यात पोहोचली असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत व माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी यात्रेचे स्वागत केले. आज झालरापाटनमधील काली तलाईतून ८९ व्या दिवशी यात्रा पुढे सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी गांधी यांनी १३ अंश सेल्सिअसच्या थंडीत यात्रा सुरू केली. यावेळी गांधी यांच्यासोबत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस (संस्था) के. सी. वेणुगोपाल, राजस्थान प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गोविंदसिंह दोस्तारा, ज्येष्ठ नेते भंवर जितेंद्र सिंह व राजस्थानचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रतापसिंह खाचरियावास आदी उपस्थित होते.

दरम्यान, राजस्थानमध्ये यात्रा १७ दिवस असेल. या काळात झालवार, कोटा, बुंदी, अलवार आदी जिल्ह्यांतून सुमारे ५०० कि.मी. अंतर जात २१ डिसेंबरला ती हरियाणात प्रवेश करणार आहे. यावेळी राहुल गांधी दौसामध्ये लालसोत येथे शेतकऱ्यांशी संवाद साधतील. तर १९ डिसेंबरला अलवार जिल्ह्यात जाणार आहेत.

  • सुखजिंदर सिंह रंधावा राजस्थान काँग्रेसचे नवे प्रभारी!

‘भारत जोडो’ यात्रे दरम्यान, राजस्थानला नवे प्रभारी मिळाले आहेत. काँग्रेसने पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांची राजस्थानचे पक्ष प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. अजय माकन यांच्या जागी रंधावा यांच्याकडे राजस्थान प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रंधावा हे काँग्रेस सुकाणू समितीचे सदस्य देखील आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा